मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज
हवामान तज्ज्ञ किरण वाघमोडे यांनी आगामी मान्सून २०२६ चा प्राथमिक अंदाज जाहीर केला आहे. हा अंदाज मुख्यतः हिंदी आणि प्रशांत महासागराच्या स्थितीवर, म्हणजेच इंडियन ओशन डायपोल (IOD), ला-निना (La Niña) आणि एल-निनो (El Niño) या घटकांवर आधारित आहे. सध्या प्रशांत महासागरात ला-निना सक्रिय आहे (जे चांगल्या पावसासाठी अनुकूल असते), पण आता ते हळूहळू कमकुवत होताना दिसत आहे. अनेक जागतिक हवामान मॉडेल्सनुसार, जानेवारी-फेब्रुवारीनंतर ला-निनाची स्थिती संपुष्टात येईल.
फेब्रुवारी ते मे दरम्यान ‘तटस्थ’ स्थिती
ला-निना संपुष्टात आल्यानंतर फेब्रुवारी ते मे या मान्सून पूर्व काळात प्रशांत महासागरात स्थिती ‘तटस्थ’ (Neutral) राहील, असा अंदाज आहे. याचा अर्थ, मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात हवामानावर ला-निनाचा किंवा एल-निनोचा कोणताही विशेष प्रभाव दिसणार नाही. तसेच, हिंदी महासागरातही आयओडी (Indian Ocean Dipole) सध्या निगेटिव्ह असला तरी तो मे महिन्यापर्यंत तटस्थ राहण्याची शक्यता आहे, ज्यामुळे मान्सूनच्या पहिल्या टप्प्यात आयओडीचा विशेष सकारात्मक प्रभाव दिसणार नाही.




















