डिसेंबर महिना कोरडा, ‘मिनी हिमालया’सारखी थंडी; २०२६ चा पावसाळा ‘मध्यम’ राहण्याचा अंदाज.
१. डिसेंबर-जानेवारीमध्ये कडाक्याची थंडी
तोडकर हवामान अंदाजानुसार, सध्या महाराष्ट्रात वेस्टर्न डिस्टर्बन्स (WD) आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यांचा म्हणावा तसा प्रभाव दिसत नाहीये. डिसेंबर महिन्यात पूर्वेकडील वारे सक्रिय असल्याने महिना कोरडा जाण्याची शक्यता आहे. २०, २१ आणि २२ तारखेच्या दरम्यान नाशिक, धुळे, जळगाव आणि छत्रपती संभाजीनगरच्या उत्तरेकडील भागात किरकोळ ढगाळ वातावरण राहू शकते, परंतु पावसाची शक्यता नाही. शहरी भागांमध्ये ‘मिनी हिमालया’सारखी थंडी जाणवत आहे, तर मराठवाडा, दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भात कडाक्याची थंडी आहे. जानेवारी महिन्याच्या पहिल्या तीन आठवड्यात फार मोठे बदल अपेक्षित नसून, संक्रांतीनंतर दिवस मोठा होत असल्याने तापमानात हळूहळू वाढ होण्यास सुरुवात होईल.
२. गारपीट आणि अवकाळी पावसाचा इशारा
फेब्रुवारी महिन्यामध्ये १९ तारखेच्या आसपास हवामानात बदल व्हायला सुरुवात होईल, परंतु हा महिना घातकी ठरणार नाही. अंदाजानुसार, मार्च आणि एप्रिल २०२६ हे दोन महिने वादळी वाऱ्याच्या अवकाळी पावसाची शक्यता दर्शवत आहेत. या अवकाळी पावसाचे मुख्य लक्ष्य खानदेश आणि विदर्भ हे भाग असू शकतात. प्रत्येक महिन्यात हा पाऊस दोन टप्प्यांमध्ये (सुमारे ४ ते ८ दिवस) विभागला जाण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसाच्या वातावरणाचा परिणाम पुढील पावसाळ्यावर होणार नाही, असेही अंदाजात स्पष्ट करण्यात आले आहे.




















