मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेत मोठी कारवाई; कागदपत्र अपलोडसाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन, अन्यथा अर्ज १ जानेवारी २०२६ पासून बाद.
MahaDBT योजनेत निधी वापराचा प्रश्न
‘महाडीबीडी फार्मर स्कीम’ अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेतील वैयक्तिक शेततळ्याच्या लाभार्थ्यांसाठी कृषी विभागाने एक अत्यंत महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहे. या योजनेत शेतकऱ्यांना ठिबक सिंचन, तुषार सिंचन, शेततळे आणि अस्तरीकरण यांसारख्या बाबींसाठी ८०% पर्यंत अनुदान दिले जाते. २०२५-२६ या वर्षासाठी, २६,९७२ लाभार्थ्यांची निवड करून त्यांना वैयक्तिक शेततळ्यासाठी पूर्वसंमती देण्यात आली होती, यासाठी १०० कोटी रुपयांची भरीव तरतूद केलेली आहे. मागील काळात अतिवृष्टीमुळे अनेक शेतकऱ्यांची कामे पूर्ण झाली नाहीत, त्यामुळे कृषी विभागाने जून २०२५ मध्ये अर्ज बाद न करण्याचे निर्देश दिले होते.
कागदपत्र अपलोड न केल्यास अर्ज रद्द
पावसाळा संपूनही, निवड झालेल्या अनेक शेतकऱ्यांनी अद्याप आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत किंवा पूर्वसंमती मिळाल्यानंतरही खोदकाम सुरू केलेले नाही. या दिरंगाईमुळे उपलब्ध निधीपैकी केवळ ३ ते ४ टक्के निधीचाच वापर झाला आहे, ज्यामुळे पात्र असूनही अनेक इच्छुक लाभार्थी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर, निधीचा योग्य वापर व्हावा आणि प्रतीक्षित लाभार्थ्यांना संधी मिळावी यासाठी कृषी विभागाने कठोर भूमिका घेतली आहे. ज्या लाभार्थ्यांची शेततळ्यासाठी निवड झाली आहे, परंतु ज्यांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आवश्यक कागदपत्रे अपलोड केलेली नाहीत, त्यांचे अर्ज १ जानेवारी २०२६ पासून थेट रद्द केले जातील.




















